Site icon samajsanchar.com

सत्य–अहिंसेच्या विचारांपासून दूर जाणे देशासाठी घातक: विकास ठाकरे

Spread the love

नागपूर, – “आज देशात द्वेष, फूट आणि असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सत्य व अहिंसेचे विचारच देशाला एकसंध ठेवू शकतात. या मूल्यांपासून दूर जाणे हे देशाच्या एकतेसाठी घातक आहे,” असे ठाम प्रतिपादन विकास ठाकरे, अध्यक्ष, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व आमदार, पश्चिम नागपूर यांनी केले.

शहीद दिनानिमित्त आज नागपूर येथील व्हरायटी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना विकास ठाकरे म्हणाले की, “महात्मा गांधींच्या विचारांवर उभा असलेला भारत सर्वसमावेशक, लोकशाही आणि संविधाननिष्ठ आहे. मात्र सत्तेच्या लालसेपोटी आज संविधानिक मूल्ये कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्ष देशात सत्य, अहिंसा, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांसाठी अखंड लढा देत राहील.”

या कार्यक्रमात उपस्थित काँग्रेस नेते, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त करत देशातील लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता आणि संविधानाचे रक्षण करण्याचा निर्धार केला.

कार्यक्रमास विकास ठाकरे, अध्यक्ष, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी व आमदार, पश्चिम नागपूर, विलास मुत्तेमवार, माजी केंद्रीय मंत्री व अध्यक्ष, जागतिक अहिंसा दिवस आयोजन समिती, आमदार (विधान परिषद) अभिजीत वंजारी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version