Site icon samajsanchar.com

अलंकापुरीत माऊली मंदिराच्या पाणदरवाजाचे लोकार्पण

Spread the love

वेदमंत्रजयघोष – हरिनाम गजर – विधिवत पूजन उत्साहात
श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाची सेवा रुजू

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरातील इंद्रायणी नदीच्या बाजूने माऊली मंदिरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या पुरातन पाणदरवाजा दुरुस्ती करणे आवश्यक होते. या मुळे नवीन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नवीन तयार करण्यात आलेल्या नक्षीकामासह लाकडी भव्य पाणदरवाजाचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या मार्गदर्शनात श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळ आळंदी यांच्या समन्वय ठेवत उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या वेळी वेदमंत्र जयघोष करीत विधिवत सागवानी लाकडाच्या भव्य पाणदरवाजाचे लोकार्पण करण्यात आले.
माउली मंदिराचे पश्चिम बाजूस वैभवी दगडी कामाचे बांधकाम असून यात पुरातन पाणदरवाजा होता. तो आता नव्याने अस्सल सागवान लाकडाचा वापर करून तयार करण्यात आला. त्यावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. हे काम श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाच्या वतीने परिश्रम पूर्वक मेहनत घेऊन सामाजिक बांधिलकीतून करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मार्गदर्शक सूचना व परवानगीने पाणदरवाजा विकसित करून देत सुतार समाजाने सेवा रुजू केली आहे.


या लोकार्पण प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, राजाभाऊ चौधरी, शंकर महाराज पांचाळ, श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष रेणुकादास महाराज पांचाळ, आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, बबनराव कुऱ्हाडे, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील यांच्या सह आजी-माजी नगरसेवक, भाविक, नागरिक तसेच श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी, सेवक उपस्थित होते.
संस्थान तर्फे समाज बांधवांचा या वेळी श्रींची प्रतिमा भेट देत सन्मान करण्यात आला. सुमारे साडे सहा लाख रुपये खर्च करून लक्षवेधी पाण दरवाजा विकसित केल्याने आळंदी मंदिराचे वैभवात वाढ झाली आहे. या सेवारत कार्याचे आळंदीतून कौतुक होत आहे.

Exit mobile version