Site icon samajsanchar.com

‘जय मल्हार’ भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र

Spread the love

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश

पुणे : मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराया, म्हाळसा पती अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या महादेवाच्या मार्तंड भैरव श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र आता रांगोळीच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. बालगंधर्व कलादालन येथे श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवावर आधारित ‘जय मल्हार’ या भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ‘श्री खंडोबा चरित्र’ रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. हे प्रदर्शन दिनांक ३० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे प्रा.अक्षय शहापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनात भारतातील द्वादश मार्तंड खंडोबा लिंग तसेच जेजुरी खंडोबा मंदिर येथील खंडोबा देवाची मानाची पगडी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त मंडळ, सुप्रसिद्ध रंगावलीकार जगदीश चव्हाण, प्रा. अक्षय शहापूरकर, प्रतीक अथणे, अजित पवार, दिनेश मंची आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण रांगोळ्यांचा समावेश प्रदर्शनात आहे. यात थ्रीडी रांगोळी, पाण्यावरची रांगोळी, पाण्याखालची रांगोळी, पाण्याच्या मधोमध साकारलेली रांगोळी, हलती रांगोळी, टू-इन-वन रांगोळी आणि प्रतिबिंब रांगोळी यांचा समावेश असून, पाहणाऱ्यांसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे.

या उपक्रमात प्रा. अक्षय शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली १०० विद्यार्थ्यांचा सहभाग असून, ३० वेगवेगळ्या रांगोळ्यांमधून श्री खंडोबा चरित्र साकारण्यात आले आहे. प्रत्येक रांगोळी साकारण्यासाठी साधारण ४० ते ४८ तासांचा कालावधी लागला असून, एकूण सुमारे ५०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे.

Exit mobile version