Site icon samajsanchar.com

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

Spread the love

पुणे, १० जुलै २०२६ : आषाढी वारीचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली “भव्य कलाकार दिंडी” आज पुण्यात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.“संतांच्या चरणी… कलेच्या संगतीने!” या संकल्पनेवर आधारित या दिंडीत चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य तसेच विविध कला क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या भव्य कलाकार दिंडीतून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्त वारी, जलसंधारण तसेच सामाजिक ऐक्य आणि सामाजिक बांधिलकी यांसारखे महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आले. कलाकारांनी आपल्या सहभागातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मासोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलम शिर्के-सामंत, चित्रपट महामंडळाचे कायदेशीर सल्लागार ॲड. मंदार जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, जयमाला इनामदार, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, गायक डॉ. उत्कर्ष शिंदे, राज काझी,वासू पाटील, अजित शिरोळे, अनिल नगरकर, राधा कुलकर्णी, आर्या घाटे यांच्यासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच बालगंधर्व परिवार ट्रस्ट पदाधिकारी व सदस्य अनेक कलाकार, मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दिंडीचा शुभारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथून झाला. त्यानंतर पुणे महानगरपालिका भवन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन दिंडी पालखी चौक, नाना पेठ येथे भक्तिमय वातावरणात पोहोचली.

या उपक्रमाचे संकल्पनाकार मेघराज राजेभोसले यांनी उपस्थित कलाकार, वारकरी, पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानत, कला, संस्कृती आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. समाजप्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक मूल्यांचा प्रसार हेही या दिंडीमागील महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही अशा सांस्कृतिक, सामाजिक आणि भक्तिमय उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या भव्य कलाकार दिंडीमुळे पुणे शहरात भक्ती, संस्कृती आणि कलेचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला. कलाकार आणि वारकरी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आषाढी वारीचा आध्यात्मिक उत्साह अधिकच द्विगुणित झाला.

Exit mobile version