मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२५ : आज विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नामवंत साहित्यिक आणि दलित पँथरचे सहसंस्थापक श्री. अर्जुन ठमाजी डांगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान सामाजिक न्याय, साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील सध्याच्या घडामोडींबाबत डॉ. गोऱ्हे आणि श्री. डांगळे यांच्यात विचारविनिमय झाला. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी साहित्य आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याची गरज यावरही यावेळी मत व्यक्त करण्यात आले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री. अर्जुन डांगळे यांच्या दीर्घकालीन सामाजिक व साहित्यिक कार्याचे कौतुक करत त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तर श्री. डांगळे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे अभिनंदन केले.
ही सदिच्छा भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.


