आरोग्य क्षेत्रातल्या नवीन आव्हानांना नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे
– मा. प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांचे प्रतिपादन
नाशिक : – आरोग्य क्षेत्रातल्या नवीन आव्हानांना नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि एक उत्तम आरोग्य सेवक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान द्या असे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला खेडच्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांशी मा. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी संवाद साधला. याप्रसंगी, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. बोधीकिरण सोनकांबळे, विद्यापीठाच्या हरित कक्षाचे प्रमुख उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे, एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्रा. शिवप्रसाद हॅलेमनी, डॉ. लिंगराज ए.आर., श्रीमती स्नेहल पाचुपते, श्रीमती शशिकला राठोड, श्रीमती अंजली देवलतकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मा. प्र. कुलगुरु डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या नवीन आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जावे आणि एक उत्तम आरोग्य सेवक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आरोग्यसेवेची सूत्रे भविष्यात तुमच्या हाती असणार आहेत. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान, अद्ययावत उपचार पध्दती आणि प्रभावी संवाद कौशल्यांनी युक्त असले पाहिजे. मात्र, त्यासोबतच रुग्णांप्रती संवेदना, सहानुभूती आणि माणुसकी जपायला हवी. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवांचे महत्व ओळखणे गरजेचे आहे. भविष्यातील आरोग्य संकटांचा सामना कोणत्याही साथीच्या रोगाच्या वेळी सर्वात आधी आणि सर्वात जास्त काळ आघाडीवर राहणाऱ्या नर्सेसच असतात. त्यामुळे त्यांचे प्रशिक्षण आणि सक्षमीकरण हा भविष्यातील आरोग्य संकटांवर सर्वात मोठा उपाय आहे.
याप्रसंगी कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, शिक्षणामुळेच व्यक्तीला नवीन ज्ञान, कौशल्य आणि विचारधारा प्राप्त होतात. त्यांच्यात स्वप्न पाहण्याची आणि ते पुर्ण करण्याची प्रेरणा निर्माण होते. तसेच विद्यार्थ्यांनी नियमितता, चिकाटी आणि परिश्रम यांचा अवलंब करायला पाहिजे, जे पुढील आयुष्यात त्यांना यशस्वी बनवते. विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने उभे राहावे, हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी हरित कक्षाचे प्रमुख उपकुलसचिव डॉ. सुनिल फुगारे यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात पंचज्ञानेंद्रिये आधारित वृक्षांची लागवड करुन सेन्सरी गार्डन विकसित करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. शरिराला झोप आवश्यक असते यासाठी मानसिक शांंतता मिळावी यासाठी प्रत्येकाने प्राणायम व योगअभ्यास करणे गरजेचे आहे. विद्यापीठात उभारण्यात आलेल्या नक्षत्र गार्डन, आरोग्य मानव, राशी गार्डन याबाबत माहिती दिली.
याकार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यापीठ परिसरात लागवड करण्यात आलेल्या विविध प्रजातिच्या वृक्षांची श्री. नंदू सोनजे यांनी माहिती दिली. एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला भेट दिली.


