पुणे/प्रतिनिधी
आज् रोजी नायगाव (ता. हवेली) :पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नायगाव येथे श्री संतविचारी कै. ज्ञानदेवबाबांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन म्हणून १०२ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन व सेवाभाव यांचा संगम साधणारा हा उपक्रम भावनिक व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कै. ज्ञानदेवबाबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले जीवन घडवले. जवळ काहीही नसताना त्यांनी गावोगावी भिक्षा मागून जिवन घडवले. स्वतः भोगलेल्या संघर्षातून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या मुलांना घडवले. गरीब, पिढीत व वंचित समाजातील कोणालाही त्यांनी भोगलेले दुःख भोगावे लागू नये, हेच त्यांचे जीवनस्वप्न होते. शिक्षण, माणुसकी आणि सेवाभाव या मूल्यांवर त्यांनी आयुष्यभर भर दिला.
या विचारांचा वारसा पुढे नेत त्यांनी आपल्या कुटुंबातील मुलांनाही समाजसेवेचा मार्ग दाखवला. त्यांचे थोरले चिरंजीव तुकाराम भोसले व दुसरे चिरंजीव लेखक भास्कर भोसले हे शाळेत शिपाई म्हणून प्रामाणिक सेवा बजावत आहेत. तिसरे चिरंजीव नामदेव ज्ञानदेव भोसले हे थोर आदिवासी समाजसेवक असून आदिवासी विषयांवरील मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांनी देशभरातील गरीब, वंचित व पिढीत समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करून उल्लेखनीय कार्य केले आहे. चौथे चिरंजीव सुनील भोसले हे पत्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत आहेत.
या सर्व कार्याचा परिणाम म्हणून आज राज्यातील हजारो पिढीत कुटुंबांना न्याय, हक्क व सन्मान मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कै. ज्ञानदेवबाबांच्या कार्याचा गौरव केला. “वृक्षारोपण हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून पुढील पिढ्यांसाठी आशा व संस्कारांचे प्रतीक आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. प्रत्येक झाडासोबत ज्ञानदेवबाबांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.कै. ज्ञानदेवबाबांचे जीवन संघर्षातून समाजनिर्मितीकडे नेणारा दीपस्तंभ ठरले असून त्यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.


