भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Spread the love

पुणे, प्रतिनिधी : राज्यातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसून भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकांच्या वेळी मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार नावे असलेल्या मतदारांचे एकाच ठिकाणी मतदान होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मनपा निवडणुकांमध्येही मतदार यादीतील घोळ कायम असून निवडणूक आयोगाचा कोणताही धाक सत्ताधाऱ्यांवर राहिलेला नाही, असा आरोप सपकाळ यांनी केला. प्रभाग रचना करताना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार करण्यात आले, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोज भाजपवर टीका करतात, मात्र तरीही सत्तेत भाजपसोबत चिकटून राहतात. ‘गोचीडासारखे वागणे त्यांना शोभत नाही,’ असा टोला सपकाळ यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ‘नूरा कुस्ती’ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरण, जैन बोर्डिंग जमीन प्रकरण यामध्ये अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाला असून त्याचे समर्थन अजित पवार करत असल्याचे सपकाळ म्हणाले. पुणे हे विद्येचे व सांस्कृतिक शहर असताना आज ड्रग्स आणि कोयत्यांसाठी ओळखले जाऊ लागले आहे. सत्तेचे सौदागर शहर विकण्याचे काम करत असून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीत न जाण्याची ठाम भूमिका असल्यामुळे आघाडी शक्य झाली नाही. मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याशी युती असून एकत्रित प्रचार सुरू आहे.

राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी केली नाही, ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढवले नाहीत, केंद्र सरकारने दिलेले दोन कोटी रोजगारांचे आश्वासनही फसवे ठरले आहे. पुण्यात मोफत मेट्रो व बससेवेची घोषणाही हवेतच असल्याची टीका त्यांनी केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असून त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. जातीधर्मातील तेढ आणि गुंडगिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

यावेळी काँग्रेस प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, ॲड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने,नीता राजपूत  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *