नाशिक : – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सन २०२६ या वर्षातील पहिली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर चर्चा करण्यात आली असून, तीन नवीन सदस्यांची पदाधिकारी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी, अध्यक्ष श्री. संदीप महाजन, प्रमुख सल्लागार डॉ. नितीन कावेडे, श्री. प्रमोद पाटील, कार्याध्यक्ष श्री. रत्नाकर काळे, सचिव श्री. संजय देशमुख आदी पधाधिकारी आणि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी, संघटनेचे कार्य अधिक विस्तारण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी श्री. अजित डेरे, श्री. महेश कुलकर्णी, श्री. समाधान जाधव या सदस्यांची नवीन पदाधिकारी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष श्री. संदीप महाजन यांनी सांगितले की, ही २०२६ ची पहिली बैठक असून आज झालेल्या निवडीमुळे संघटनेला मोठी ताकद मिळाली आहे. आम्ही नेहमीच कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कटिबध्द राहू. कोणावरही अन्याय होऊ न देणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रलंबित मागण्या पूर्ण करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संघटनेची खरी ताकद ही केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये नसून ती प्रत्येक सदस्याच्या सक्रिय सहभागात आणि एकजुटीत असते. येणाऱ्या काळात आपल्याला सामाजिक बांधीलकी जपत अधिक प्रभावी प्रकल्प राबवायचे आहेत. प्रत्येक सदस्याने संघटनेची ध्येयधोरणे विद्यापीठाच्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
याप्रसंगी प्रमुख सल्लागार डॉ. नितीन कावेडे यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या प्रगतीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वाटा अत्यंत मोलाचा आहे. नवीन वर्षात नवीन ऊर्जेने काम करताना आपल्याला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच प्रशासकीय कामात देखील वेग आणायचा आहे. केवळ विचारांची मांडणी करुन चालणार नाही, तर त्या विचारांची शिस्तबध्द अंमलबजावणी करणे हीच कोणत्याही संघटनेच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. प्रविण घाटेकर तसेच सूत्रसंचालन श्रीमती अनूपमा पाटील यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची २०२६ मधील पहिली बैठक उत्साहात संपन्न


