प्रचाराची धामधूम संपताच चिमुकला आई-बापाच्या कुशीत

Spread the love

– भोकरे दाम्पत्याने मुलाशी खेळण्यात घालवला वेळ

पुणे: ‘घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी’ या ओळींप्रमाणे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली प्रचाराची धामधूम संपताच राजकीय गडबडीत हरवलेली कौटुंबिक ओल पुन्हा एकदा घराघरांत जाणवू लागली. प्रभाग २५ अ मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. अमृता गणेश भोकरे आणि गणेश सोमनाथ भोकरे यांच्यासाठी प्रचाराचा शेवट हा केवळ राजकीय टप्पा नव्हता, तर भावनांनी ओथंबलेला क्षण ठरला. प्रचाराच्या धावपळीत आई-वडिलांचा सहवास कमी मिळालेला चिमुकला अखेर त्यांच्या कुशीत विसावला आणि घरात हसऱ्या क्षणांनी पुन्हा जागा घेतली.

गेल्या पंधरा दिवसांत गल्लीबोळ, वस्ती, चौका-चौकांत फिरत मतदारांशी संवाद साधताना दिवस कसा सरला, हे कळलेच नाही. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सभा, बैठका, घराघरांत भेटी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू होत्या. या काळात चिमुकल्याची जबाबदारी आजी-आजोबा आणि नातेवाइकांनी सांभाळली. मात्र प्रचाराची रणधुमाळी थांबताच भोकरे दाम्पत्याने सर्वप्रथम मुलाला वेळ देण्याचा निर्णय घेतला.

खेळणी, गोष्टी, त्याचे लाड या साऱ्या साध्या क्षणांतून प्रचाराचा ताण नकळत दूर झाला. आई-बापाच्या कुशीत विसावलेला चिमुकला पाहून कार्यकर्ते आणि समर्थकही भावूक झाले.

“लोकांसाठी झटताना कुटुंबाचा आधारच खरी ऊर्जा देतो,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आणि आपुलकी यामुळे आत्मविश्वास वाढल्याचे भोकरे दाम्पत्याने सांगितले.

दरम्यान, प्रचार सांगतेवेळी भोकरे यांनी मतदारांनी मतरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. ‘लोकशाहीच्या या उत्सवात मतदानाचा हक्क बजावून माझ्यासारख्या कार्यकर्तीला जनसेवेचे काम करण्याची संधी माझ्या प्रभागातील नागरिक देतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *