इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) च्या यंग शेफ ऑलिम्पियाडच्या १२ व्या आवृत्तीत पुण्यात आंतरराष्ट्रीय शेफ्सचा सहभाग

Spread the love

पुणे, : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) तर्फे ‘यंग शेफ ऑलिम्पियाड २०२६’ (YCO) या जगातील विद्यार्थी शेफ्ससाठीच्या सर्वात मोठ्या पाककला स्पर्धेची १२वी आवृत्ती आयोजित करण्यात येत आहे. या पाककलेच्या माध्यमातून एकात्मता, ऐक्य आणि शाश्वततेचा उत्सव साजरा करणारा हा उपक्रम विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या राष्ट्रांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या मैत्रीचे सेतू बांधत आला आहे. यंदा या व्यासपीठावर जगभरातील ४० हून अधिक देशांमधील विद्यार्थी शेफ्स एकत्र येत असून, तरुण व्यावसायिकांसाठीची ही जगातील सर्वात व्यापक आणि समावेशक पाककला स्पर्धा ठरत आहे.

वायसीओ (YCO ) २०२६ ची संकल्पना हि ‘आर्टीफिशीअल इंटेलिजन्स (AI)’ च्या माध्यमातून जागतिक पाककला वारसा जतन करणे’ अशी असून, आतिथ्य शिक्षणात तंत्रज्ञानाचा जबाबदारीने समावेश करताना मानवी कौशल्य, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक समज यांचे महत्त्व केंद्रस्थानी राखण्याची आयआयएचएम (IIHM) ची व्यापक दृष्टी यातून प्रतिबिंबित होते. विविध खंडांतील वेगवेगळ्या पाकपरंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पर्धकांच्या सहभागामुळे वायसीओ (YCO) २०२६’ पाककलेला संस्कृतींमधील प्रभावी दुवा म्हणून अधोरेखित करते आणि तरुण पाककला प्रतिभेसाठी भारताची जागतिक भेटीचे केंद्र म्हणून भूमिका अधिक दृढ करते.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी ३ फेब्रुवारी २०२६ रोजी बंगळुरू, दिल्ली, पुणे, हैदराबाद आणि गोवा या पाच शहरांमध्ये पार पडेल, तर पुण्यातील प्राथमिक फेरीत इटली, मेक्सिको, कॅनडा, मलेशिया, सायप्रस, इजिप्त आणि श्रीलंका अशा सात देशांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या फेरीत स्पर्धकांना ‘मॉडर्न ब्रॅसेरी/बिस्ट्रो’ शैलीतील मुख्य पदार्थ म्हणून भेटकी मासा तसेच गरम किंवा थंड प्रकारातील व्हेगन डेझर्ट तयार करून चार प्लेट्समध्ये सादर करण्याचे आव्हान देण्यात आले.

तसेच मुख्य पदार्थ म्हणून क्रीमयुक्त मटर प्युरीवर पॅन-सिअर केलेला भेटकी फिश फिले सादर करण्यात आले, ज्यासोबत सेलरी, ॲस्पॅरॅगस (ही एक भाजी / वनस्पती आहे जी प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशियात आढळते), भाजलेले टोमॅटो व चेरी टोमॅटो देण्यात आले होते. या पदार्थावर हर्ब बटर सॉसची हलकी भुरळ घालण्यात आली होती. तर डेझर्टमध्ये गरम किंवा थंड प्रकारातील व्हेगन चीजकेक सादर करण्यात आले, ज्यावर काजूचे फिलिंग, प्रीमियम कोको चव व सिझनिंगसाठी बिस्किटाचा वापर करण्यात आला असून शेवटी व्हेगन काजू फिलिंगने त्याची आकर्षक मांडणी करण्यात आली.

या प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नामवंत शेफ उपस्थित होते. यामध्ये वेस्टमिन्स्टर किंग्सवे कॉलेज, लंडन येथील हॉस्पिटॅलिटी आणि क्युलिनरी आर्ट्स स्कूलचे प्रमुख शेफ पॉल जर्विस; बुड्ल्स, लंडन येथील एक्झिक्युटिव्ह शेफ स्टीफन कार्टर; जागतिक पातळीवरील प्रसिद्ध पेस्ट्री तज्ज्ञ व कॅलेबॉ अँबॅसिडर शेफ सारा हार्टनेट; जुमेराह कार्लटन टॉवर, नाइट्सब्रिज येथील एक्झिक्युटिव्ह शेफ मारिओ परेरा; क्युलिनरी आणि जागतिक एफ अँड बी क्षेत्रातील द्रष्टे शेफ शॉन केनवर्थी; तसेच द फर्न हॉटेल अँड रिसॉर्ट्स (लंडन), कॉर्पोरेट एफ अँड बी चे शेफ रितेश सेन यांचा समावेश होता.

या प्रसंगी बोलताना इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IIHM) चे अध्यक्ष तसेच वायसीओ (YCO ) चे अध्यक्ष डॉ. सुबोर्नो बोस यांनी सांगितले, “यंग शेफ ऑलिम्पियाड हा केवळ पाककलेशी संबंधित कार्यक्रम नाही, तर स्वयंपाकाच्या माध्यमातून राष्ट्रांना एकत्र आणणाऱ्या एकात्म शक्तीचा तो सशक्त प्रत्यय आहे. नवकल्पना, कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर तसेच पाककलेतील चव व स्वाद यांच्या समतोलातून तरुण शेफ्स उज्ज्वल उद्याची वाटचाल घडवतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

यंग शेफ ऑलिम्पियाड २०२६’ अंतर्गत सहभागी स्पर्धक ‘युनायटेड वर्ल्ड ऑफ यंग शेफ्स’ (UWYC) या विशेष उपक्रमाचाही भाग होते. मैत्री, सौहार्द आणि ऐक्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून तीव्र स्पर्धेच्या वातावरणातही पाककलेच्या माध्यमातून एकोप्याचा अनुभव यंग शेफ ऑलिम्पियन्सना घेता आला. प्राथमिक फेरीच्या एक दिवस आधी पुणेसह विविध शहरांमध्ये UWYC चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यात हा कार्यक्रम रॅडिसन ब्लू, पुणे खराडी येथे पार पडला. या वेळी स्पर्धकांनी आपल्या देशांचे पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ सादर केले. इटालियन स्पॅघेटी बोलोनेझ, मलेशियन नासी लेमक, कॅनेडियन पुटीन, मेक्सिकन टॅकोज, सायप्रसचे सुव्लाकी, इजिप्शियन कोशारी, श्रीलंकन चिकन करी यांसह विविध देशांतील पदार्थांचा पाहुण्यांनी आस्वाद घेतला.

प्राथमिक फेरीच्या समाप्तीनंतर ४० देशांचे प्रतिनिधी अंतिम टप्प्यासाठी कोलकाता येथे रवाना होणार आहेत. ४ ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत IIHM च्या ग्लोबल कॅम्पस, कोलकाता येथे ऑलिम्पियाडचे सर्व महत्त्वाचे अंतिम कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यंग शेफ ऑलिम्पियाड २०२६ च्या भव्य अंतिम फेरीत अव्वल १० यंग शेफ ऑलिम्पियन्स आपले कौशल्य सादर करणार आहेत. यासोबतच ‘प्लेट ट्रॉफी’ आणि ‘डॉ. सुबोर्नो बोस क्युलिनरी इंटरनॅशनल चॅलेंज’ या मानाच्या पुरस्कारांसाठीही चुरस रंगणार आहे. या जागतिक व्यासपीठावरील ट्रॉफी तरुण शेफ्सच्या कारकिर्दीला नवी दिशा देणाऱ्या ठरणार असून त्यांच्या कौशल्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणार आहेत.

या कार्यक्रमाला रॅडिसन ब्लू पुणे खराडी, नोवोटेल विमान नगर, आयबिस विमान नगर, चुफांग एशियन किचन अँड बार आणि सांझ फॅमिली रेस्टॉरंट या नामांकित हॉस्पिटॅलिटी भागीदारांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *