पुणे : भारत इतिहास संशोधक मंडळ व श्री देवदेवेश्वर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “दिल्ली विजय आणि पानिपत बदला विजयसोहळा” या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे.
पानिपतच्या युद्धानंतर तब्बल दहा वर्षांनी महादजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा साम्राज्याने दिल्लीवर पुन्हा विजय मिळवला. तुकोजी होळकर, विसाजीपंत बिनीवाले, रामचंद्र कानडे यांच्यासह मराठा सेनानींनी १० फेब्रुवारी १७७७ रोजी दिल्ली जिंकून पानिपतच्या पराभवाचा बदला घेतला. याच मोहिमेत नजीबखान रोहिलाचे राज्य जिंकून नजीबाबाद राजधानीसह घोसगड, पत्रगड हे किल्ले ताब्यात घेण्यात आले. नजीबाबाद येथे नजीबखानाची कबर उद्ध्वस्त करून गंगेत विसर्जित करण्यात आले. हा विजय मराठ्यांच्या शौर्याचा व पराक्रमाचा महत्त्वपूर्ण अध्याय मानला जातो.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एअर चीफ मार्शल प्रदीप वसंत नाईक (निवृत्त) (PVSM, VSM) असणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद एअर मार्शल भूषण गोगटे (निवृत्त) (PVSM, AVSM, VSM) भूषविणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे (सचिव – भारत इतिहास संशोधक मंडळ) मार्गदर्शन करणार आहेत.
याच कार्यक्रमात शिंदे सरकार उत्तमराव जी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. पानिपत शौर्यदिनाचा कार्यक्रम महादजी शिंदे छत्री, वानवडी (पुणे) येथे गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित केला जात असून या उपक्रमाला शिंदे सरकारचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची माहिती पांडुरंग बलकवडे यांनी दिली.
तसेच, महादजी शिंदे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अमेरिकेतील न्यूयॉर्क (USA) येथे उभारण्याचा संकल्प असून या कार्यासाठी उत्तमरावजी यांनी दिलेल्या योगदानाबद्दल १० फेब्रुवारी रोजी योग्य त्या सत्काराने त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही बलकवडे यांनी सांगितले.
हा विजयसोहळा भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात आयोजित करण्यात आला असून इतिहासप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


