स्ट्रॅप: शिवभोजन योजनेतील गैरप्रकार उघड | पोलीस विभागाच्या अपयशावरही विधानसभेत जोरदार हल्ला
नागपूर: पश्चिम नागपूरचे आमदार तथा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज विधानसभेत जिल्हा सामान्य रुग्णालय, मानकापुर येथील गंभीर त्रुटींचा मुद्दा ठामपणे उपस्थित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली. रुग्णालयाची कामे एक वर्षापूर्वी प्रत्यक्ष सुरू झाली असली तरी ऑपरेशन थिएटर (OT) आणि इतर महत्त्वाच्या वैद्यकीय सेवा अद्याप सुरू न झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तब्बल नऊ वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही प्रकल्पाची कामे अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी मंजूर करण्याची जोरदार मागणी केली. नव्याने उभारलेल्या रुग्णालयात स्वच्छता सेवा तात्पुरत्या करारावर चालत असून नव्या इमारतीला २० वर्षे जुन्या रुग्णालयाचा दर्जा आल्यासारखी परिस्थिती असल्याची टीका त्यांनी केली. पुरेशा संख्येत डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी नियुक्त केलेले नाहीत. कॅन्टीन, पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांसारख्या मूलभूत सेवा अद्याप कागदावरच असल्याचे त्यांनी सांगितले.
हा रुग्णालय प्रकल्प विकास ठाकरे यांच्या पाच वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच एक वर्षापूर्वी सुरू होऊ शकला.
याशिवाय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो आणि एआयआयएमएस रुग्णालयांमधील अपुऱ्या सुविधा व सेवांबाबतही त्यांनी सरकारला जाब विचारत आरोग्य क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली.
______________
शिवभोजन योजनेतील गैरप्रकार उघड
महाविकास आघाडी सरकारने गरजू आणि गरीब नागरिकांसाठी सुरू केलेला शिवभोजन प्रकल्प हा संपूर्ण महाराष्ट्रात लोकहिताचा आणि यशस्वी उपक्रम ठरला असल्याचे सांगताना पश्चिम नागपूरचे आमदार तथा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सध्याच्या सरकारच्या काळात काही व्यक्ती संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून या योजनेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. बंद पडलेल्या केंद्रांनाही अनुदान वितरित केले जात असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले. प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या केंद्रांची प्रलंबित बिले तात्काळ मंजूर करून गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर व निर्णायक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
______________
पोलीस विभागाच्या अपयशावर सवाल
नागपूरातील दोन गंभीर घटनांचा उल्लेख करत पश्चिम नागपूरचे आमदार तथा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या वर्षी विधानसभेत मुद्दा उपस्थित करूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मेयो रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेल्या आरोपीला तहसील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पळून जाण्याची संधी दिली आणि चार्जशीटमध्ये त्याला ‘फरार’ दाखवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
तसेच २३ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये एका आरोपीने महिला पोलीस अधिकारी आणि त्यांच्या पथकासोबत गैरवर्तन व मारहाण केल्याची गंभीर घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अधोरेखित केल्या.
(छायाचित्र शीर्षक: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या गुरुवारी मुंबईतील विधान भवन भेटीदरम्यान पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्या इतर आमदारांसह त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.)


