समाजभान जपणारा कर्तव्यदक्ष पत्रकार प्रेरणादायी कार्याची वाटचाल

Spread the love

पुणे : स्वतःच्या वार्षिक उत्पन्नातील तब्बल २० टक्के रक्कम समाजकार्यासाठी खर्च करणारा एक पत्रकार आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये मागील दहा वर्षांपासून सातत्याने उल्लेखनीय कार्य करत, त्यांनी ‘कर्तव्यदक्ष व समाजभान जपणारा पत्रकार’ अशी ओळख निर्माण केली आहे.

समाधान भागवत काटे हे सध्या पुण्यातील एका नामांकित मराठी वृत्तपत्रात बातमीदार म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी २०१६ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे शिवजयंतीची सुरवात त्यांनी सामाजिक उपक्रमातून केली. पुणे, कोल्हापूर, सोलापूर यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले जातात. सोलापूर येथील स्थानिक वृत्तपत्रात बातमीदार ते व्यवस्थापक असा तीन वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून एम.ए. (मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली.

२०११ पासून माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले काटे आरोग्य, शिक्षण, गुन्हेगारी, राजकारण आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे वार्तांकन करत आहेत. ‘समाजकार्यातून राष्ट्रप्रगती’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य सत्यात उतरवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात.

काटे यांचे कार्य हे केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित नसून, ते समाजाला दिशा देणारे आणि माणुसकी जपणारे आहे. अशा व्यक्तींच्या कार्याला साथ देणे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्यात आपला वाटा उचलणे होय. त्यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे हाच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान ठरेल.
————–
निवडक सामाजिक उपक्रम
– विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप
– मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे
– स्वच्छता अभियान व आपत्ती व्यवस्थापन उपक्रम
– उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान
– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शिवसंस्कार शिबीर’
– रक्तदान शिबिरे
– वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
————-
प्रतिक्रिया
“पत्रकारिता करत असताना सामाजिक भान जपणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदतीचा हात द्यावा. केवळ सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. आपली छोटीशी मदत देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकते.”
— समाधान काटे
संस्थापक/अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *