भिमजयंती डीजे मुक्त साजरी करण्याच्या निर्णयाचे सर्व स्तरांतून आणि उपस्थित अनुयायांकडून जोरदार स्वागत 

Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ‘डीजे’मुक्त; ३० फुटी बुद्धरूपाने वेधले सर्वांचे लक्ष

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या मिरवणुकांमध्ये यंदा एक क्रांतिकारी बदल पाहायला मिळाला. गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली डीजेची परंपरा मोडीत काढत, ‘भीमसेवा प्रतिष्ठान’ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यंदाची जयंती ‘डीजे’मुक्तसाजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्व स्तरांतून आणि उपस्थित अनुयायांकडून जोरदार स्वागत करण्यात आले.

शांततेच्या माध्यमातून विचारांचा जागर
‘गोंगाटात विचार हरवू नका’ हा मोलाचा संदेश देण्यासाठी यंदा डीजेऐवजी वैचारिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला. वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन ‘मध्यवर्ती जयंती समिती अवाहनाला प्रतिसाद देत भिमसेवा प्रतिष्ठाणचे रामभाऊ डंबाळे , सिध्दांत सुर्वे, निखिल बहुले , अविराज मराठे , प्रदीप कांबळे , प्रतिक डंबाळे, विकी भालेराव , समाधान सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय एकमताने घेतला.

प्रमुख आकर्षण: ३० फुटी बुद्धरूप
यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ३० फुटांचे भव्य बुद्धरूप असलेला विशेष देखावा. पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हा देखावा उभारण्यात आला होता. शांततेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

‘वाचाल तर वाचाल’: पुस्तकांचे वाटप
केवळ देखावेच नव्हे, तर कृतीतूनही विचारांचा वारसा जपण्याचा प्रयत्न यंदा दिसला. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून सुमारे एक हजार अनुयायांना महापुरुषांच्या विचारांची पुस्तके मोफत वाटण्यात आली. ‘वाचाल तर वाचाल’ हा बाबासाहेबांचा संदेश प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे समितीने सांगितले.

हजारो अनुयायांचे सहकुटुंब अभिवादन
पुणे स्टेशन परिसरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी उसळली होती. हजारो भीमसैनिकांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहून शिस्तबद्ध पद्धतीने महापुरुषांना अभिवादन केले. डीजेच्या गोंगाटाशिवाय पार पडलेल्या या वैचारिक आणि शांततामय सोहळ्याने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

“ नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पहाता पुढिल वर्षीही नो डिजे या धर्तीवर जयंती साजरी करणार असल्याचा निर्धार भिमसेवा प्रतिष्ठान कडून करण्यात आला आहे. “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *