डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सूर्यदत्तात भव्य सोहळा; अॅड. मोहन वाडेकर व अॅड. शारदा वाडेकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सुर्यभारत राष्ट्रीय सन्मान” प्रदान

Spread the love

“सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट मध्ये समता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश; अॅड. मोहन वाडेकर व अॅड. शारदा वाडेकर यांना ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर सूर्यभारत राष्ट्रीय सन्मान   प्रदान   ’”

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुपतर्फे भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न…….

समता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश : डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  विचारांचा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टीट्युटमध्ये जागर : समता, शिक्षण आणि न्यायाचा संदेश

 
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे एक भव्य, दिमाखदार आणि विचारप्रवर्तक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घडवून आणण्याचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या प्रतीचेही पूजन करून  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे समाजातील कायदे क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रख्यात कायदेतज्ज्ञ अॅड. मोहन वाडेकर आणि अॅड. शारदा वाडेकर यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा प्रतिष्ठेचा सन्मान ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुधाकर बोकफोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील न्याय, समता आणि कायदेविषयक जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या या दांपत्याचा  गौरव करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या मान्यवरांचे स्वागत केले.

या कार्यक्रमास सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन डॉ. संजय बी. चोरडिया यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अॅड. पांडुरंग थोरवे , संस्थेच्या सहायक उपाध्यक्षा मा स्नेहल नवलखा मॅडम, श्री. अक्षीत कुशल, अॅड. मोनिका सेहरावत आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. संजय बी. चोरडिया यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित केली. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले. “समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीने पुढे यावे,” असे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व उत्साहाने सहभाग नोंदवला. बाबासाहेबांच्या महान कार्याला मानवंदना अर्पण करत सर्वांनी एकाच सुरात १३५ वेळा टाळ्यांचा कडकडाट केला. या अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे संपूर्ण सभागृह दणाणून गेले आणि वातावरणात ऊर्जा, अभिमान व प्रेरणेची सशक्त लहर निर्माण झाली. प्रत्येक टाळी ही केवळ आवाज नव्हती, तर ती समता, न्याय आणि शिक्षणाच्या मूल्यांप्रती व्यक्त झालेली एक जिवंत भावना होती. या क्षणाने कार्यक्रमाला एक अविस्मरणीय उंची प्राप्त करून दिली.

मुख्य अतिथी डॉ. सुधाकर बोकेफोडे यांचाही त्यांच्या कार्यबदल विशेष सन्मान करण्यात आला. ते  बोलताना म्हणाले कि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आजच्या समाजातील संदर्भ अत्यंत प्रभावी शब्दांत मांडला. त्यांनी सांगितले की, “डॉ. आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश हा केवळ इतिहासापुरता मर्यादित नसून तो आजच्या आणि उद्याच्या भारतासाठी मार्गदर्शक आहे.” ते पुढे म्हणाले की, समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल, तर प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षण हेच अन्यायाविरुद्ध लढण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. बोकेफोडे यांनी सूर्यदत्ता ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे, तर सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण होते. त्यांनी पुरस्कारप्राप्त अॅड. मोहन वाडेकर आणि अॅड. शारदा वाडेकर यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या योगदानामुळे समाजात न्याय आणि कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होत असल्याचे नमूद केले.

अॅड. पांडुरंग थोरवे यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रभावी भाषणातून भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा गौरवशाली इतिहास जिवंत करून दाखवला. संविधान निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी अत्यंत सुस्पष्ट आणि प्रभावी शब्दांत उलगडत, विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या  हाती लिखित राज्यघटनेची प्रत देऊन तिच्या मूल्यांची जाणीव प्रत्यक्ष अनुभवातून करून दिली.  त्यांच्या शब्दांमधून संविधानामागील विचारसंपदा, त्याग आणि मूल्यांचा गाभा स्पष्टपणे जाणवला. इतिहासातून प्रेरणा घेत, समतामूलक आणि जबाबदार समाज घडविण्याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात दृढपणे रुजवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर अॅड. मोहन वाडेकर आणि अॅड. शारदा वाडेकर यांनी आपल्या मनोगतातून मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा उल्लेख करत सांगितले की, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. महात्मा फुले यांची द्विशताब्दी जन्म वर्ष  सध्या साजरे केले जात आहे , विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्मारकाला भेट द्यावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले  आणि लगेच संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा डॉ संजय चोरडिया यांनी त्यांना अनुमोदन दिले आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर व्हावा म्ह्णून २०० व्या जयंतीचे निमित्त साधून आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम राबवू असे आश्वासन दिले . सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  सातत्याने गेली कित्येक वर्षे असे कार्यक्रम राबवत आहे आणि यापुढेही राबवत राहील हे हि त्यांनी याठिकाणी नमूद केले.

अॅड. मोहन वाडेकर पुढे म्हणाले की, “यश मिळवण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसून सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि समाजाप्रती बांधिलकी असणे तितकेच आवश्यक आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करण्याचे आवाहन करत, आंबेडकर आणि फुले यांच्या विचारांवर चालत जबाबदार, सजग आणि संवेदनशील नागरिक बनण्याची प्रेरणा दिली.

या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आंबेडकर विचारांवर आधारित चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक होते.

 
सूर्यदत्ता लॉ कॉलेजमधील मूट कोर्ट सुविधेला भेट देऊन त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले. इतर ठिकाणी उपलब्ध असलेल्या मूट कोर्टच्या तुलनेत ही सुविधा उत्कृष्ट आणि उच्च दर्जाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, अशी दर्जेदार सुविधा इतर महाविद्यालयांनाही उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. त्यावर सूर्यदत्ता संस्थेकडून ही सुविधा आधीपासूनच इतर संस्थांसाठी खुली करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या मूट कोर्टचे विशेष म्हणजे, न्यायव्यवस्थेच्या सर्व आवश्यक घटकांचा समावेश असलेली, कायमस्वरूपी आणि अत्याधुनिक सुविधा येथे उभारण्यात आलेली आहे—जी अत्यंत दुर्मीळ मानली जाते.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व सूर्यदत्ता लॉ कॉलेज तर्फे अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्कृष्टरीत्या पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कृष्णा धायगुडे व कु. दीपशिखा यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी शैलीत साकारले, तर प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी त्यांना समर्थ साथ देत कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचा शेवट सकारात्मक ऊर्जेने आणि प्रेरणादायी संदेशाने झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *