इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरामुळे सुमारे ११ हजार लिटर डिझेलची दैनंदिन बचत-विभाग नियत्रंक अरुण सिया
पुणे, : माहे मे २०२६ पासून पेट्रोल, डिझेल व सीएनजी इंधनामध्ये झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने आगार पातळीवर डिझेल बचतीसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, विभागात १०५ इलेक्ट्रिक वाहने असून दैनंदिन ४६ हजार २३२ किलोमीटर चालनात येतात, त्यामुळे जवळपास १० हजार ९८१ लिटर डिझेलची दैनंदिन बचत होत आहे. येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर पूर्णक्षमतेने करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती विभाग नियत्रंक अरुण सिया यांनी दिली आहे.
पुणे विभागातील आगारांना आगार पातळीवर उद्दिष्टे निश्चित करुन देण्यात आलेली आहे. प्रत्येक आगाराने मागील वर्षाच्या तुलनेत १ ने किलोमीटर प्रति १०लिटरमध्ये (केपीटीएल) वाढ करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या फेऱ्यांचे उत्पन्न कमी झालेले आहेत त्या फेऱ्या तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आल्या आहेत. विभाग किंवा आगार पातळीवर चालकांच्या केपीटीएलमध्ये वाढ होण्याकरीता त्यांना प्रबोधन करण्यात येत आहे तसेच वरिष्ठ पातळीवरुन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती श्री. सिया यांनी दिली आहे.


