अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक करार; विजयभूमी व एनटीटीएफ यांची संयुक्त पुढाकार
पुणे : महाराष्ट्रातील कर्जत येथे स्थित नामांकित विजयभूमी विद्यापीठ आणि पुणे येथील अग्रगण्य तांत्रिक प्रशिक्षण संस्था नेट्टूर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन (NTTF) यांच्यात कौशल्याधारित, सक्षम व उद्योगासाठी तत्पर मनुष्यबळ निर्मितीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. हा करार अभियांत्रिकी व तांत्रिक शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, उद्योगाशी संलग्न प्रात्यक्षिक अनुभव, अभ्यासक्रम विकास व अद्ययावत करणे, प्राध्यापकांचे सहकार्य तसेच विविध कौशल्यविकास योजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे शैक्षणिक ज्ञान व उद्योगाच्या अपेक्षा यांतील दरी कमी होऊन विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
सामंजस्य करारावर एनटीटीएफकडून व्यवस्थापकीय संचालक रवी टेनेटी यांनी स्वाक्षरी केली, तर विजयभूमी विद्यापीठाच्या वतीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी उद्योगांच्या गरजांनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्याच्या एनटीटीएफच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
या कार्यक्रमास एनटीटीएफचे व्यवस्थापकीय संचालक रवी टेनेटी, उपाध्यक्ष (COE) जी. एस. कल्पना, विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष संजय पाडोदे, प्रा. एडविन मोझेस (सीईओ – सेंटर फॉर डेव्हलपमेंटल एज्युकेशन, JAGSOM बेंगळुरू), डॉ. सालूर श्रीकांत पटनायक, प्रा. बिनिता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
हा करार शिक्षण व उद्योग क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात ठरेल, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला.


