खडकी परिसरातील सृष्टी मित्तलची उज्ज्वल कामगिरी — १०वी CBSE परीक्षेत ९६.६% गुण

Spread the love

पुणे (प्रतिनिधी): खडकी, बोपोडी आणि रेंज हिल्स या परिसरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी सृष्टी हेमंत मित्तल हिने केली आहे. CBSE दहावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सृष्टीने तब्बल ९६.६% गुण मिळवत या संपूर्ण परिसरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सृष्टीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये तसेच परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच हे यश मिळाल्याचे सृष्टीने सांगितले. तिच्या या यशामागे पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे मोलाचे योगदान असल्याचेही तिने नमूद केले.
सृष्टीचे वडील हेमंत मित्तल हे व्यवसायाने केटरिंग सेवा चालवतात, तर आईनेही तिच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुलीच्या या यशामुळे कुटुंबाचा अभिमान अधिकच वाढला आहे.
शाळेतील शिक्षकांनीही सृष्टीच्या मेहनतीचे आणि चिकाटीचे कौतुक केले आहे. भविष्यात सृष्टीने उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खडकी, बोपोडी आणि रेंज हिल्स परिसरात सृष्टी मित्तलचे हे यश प्रेरणादायी ठरत असून इतर विद्यार्थ्यांसाठी ती एक आदर्श ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *