आळंदी, प्रतिनिधी : आळंदी येथील भागीरथी नाला मार्गाची दुरावस्था कायम असून या मार्गाची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केली आहे. येत्या काळात संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान करणार असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरील हा पर्यायी रस्ता असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक व भाविकांची ये-जा होत असते. मात्र, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून उताराचा भाग धोकादायक ठरत आहे. पावसाळा आणि पायी वारीचा विचार करता भागीरथी नाला तसेच दगडी पुलाची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
“एखादा अपघात झाल्यानंतर प्रशासन जबाबदारी घेणार का?” असा सवाल उपस्थित करत अर्जुन मेदनकर यांनी नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, बुरुड समाज धर्मशाळेचे बांधकाम सुरू असून संबंधितांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अन्यथा संबंधित संस्थेचा बांधकाम परवाना रद्द करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही पालखी सोहळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


