चंद्रकांतदादांनी कोथरुडमध्ये भरवली बालकलाकारांची ‘शाळा’

Spread the love

चिमुकलीच्या अभिनयाला दिली मनमुराद दाद!

पुणे: नेहमी राजकीय घडामोडी आणि शासकीय बैठकांमध्ये व्यस्त असणारे नेते जेव्हा अचानक लहान मुलांच्या विश्वात रमून जातात, तेव्हा अवतीभवतीचा माहोल आनंदाने प्रफुल्लित होतो. असाच एक सुंदर आणि भावनिक क्षण आज कोथरुडमधील महेश विद्यालयात पाहायला मिळाला. निमित्त होते, ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ संस्थेच्या समर कॅम्पला राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीचे.

या कॅम्पमध्ये प्रवेश करताच चंद्रकांतदादांनी मंत्रिपदाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवला आणि थेट मुलांमध्ये जाऊन बसले. क्षणार्धात ते एका शिक्षकाच्या भूमिकेत शिरले आणि त्यांनी बालकलाकारांची एक छानशी ‘शाळा’च भरवली. “तुला काय व्हायचंय?”, “तुझा आवडता छंद कोणता?” असे आपुलकीचे प्रश्न विचारत दादांनी प्रत्येक मुलाची आवड-निवड जाणून घेतली. मोठ्या नेत्याला इतक्या जवळून आणि हसून बोलताना पाहून सुरुवातीला बुजलेली मुलेही काही वेळातच दादांशी अगदी मित्रासारखी गप्पा मारू लागली.

या गप्पांच्या फडात शिवन्या बुचके ह्या बालकलाकाराने ‘आई’वर आपली एक नाट्यकृती सादर केली. त्याचा तो निरागस अभिनय, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक इतकी अप्रतिम होती की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण मंत्रमुग्ध झाले. स्वतः चंद्रकांतदादाही त्या चिमुकलीचा अभिनय पाहून भारावून गेले. त्यांनी केवळ टाळ्याच वाजवल्या नाहीत, तर त्या चिमुरडीला कॅडबरी आणि पाठीवर कौतुकाची थाप देऊन मनमुराद दाद दिली. एका मोठ्या नेत्याकडून मिळालेली ही दाद त्या चिमुकला बालकलाकाराचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल, यात शंका नाही.

उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल आणि टीव्हीपासून दूर राहून अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या या मुलांचे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना व्यासपीठ देणाऱ्या ‘नाट्यतीर्थ फाऊंडेशन’ संस्थेचे चंद्रकांतदादांनी मनापासून कौतुक केले. राजकारणाच्या धावपळीतून वेळ काढत दादांनी मुलांसोबत अनुभवलेले हे निखळ आणि आनंदाचे क्षण पाहणाऱ्यांच्या मनाला नक्कीच स्पर्श करून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *