विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. ६ ते ८ मे पर्यंत पुण्यात आयोजन

Spread the love

कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या स्पर्धेसाठी ४१ संघ सहभागी होणार

पुणे, दि. ४ मे २०२६:  अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या क्रीडास्पर्धेचे आयोजन बुधवार (दि. ६) ते शुक्रवारपर्यंत (दि. ८) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १० राज्यांतील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष व महिला गटातील तब्बल ४१ संघ सहभागी होत आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे ४१ संघ आणि सुमारे ५३८ महिला व पुरुष खेळाडू सहभागी होत आहेत. कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलमध्ये पुरुष संघात लढत होईल तर कबड्डी व खो-खोमध्ये महिला संघांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अजिंक्यपदासाठी कबड्डीमध्ये पुरुष व महिला गटातील १८ संघ तर खो-खोसाठी ९ संघ सहभागी होत आहेत. तसेच कुस्ती व बास्केटबॉलमध्ये अजिंक्यपदासाठी पुरुष गटामध्ये प्रत्येकी ७ संघांमध्ये लढत होणार आहे.

विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. ६) सकाळी ९.३० वाजता राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्या मुख्य उपस्थितीत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी राज्याच्या क्रीडा आयुक्त सौ. शीतल तेली-उगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीच्या संचालक मंडळासह अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. जिग्नेश राय, सरचिटणीस श्री. नरेश कुमार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमार (महापारेषण) व श्री. राधाकृष्णन बी. (महानिर्मिती) यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होईल.

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पुणे प्रादेशिक संचालक श्री. सुनील काकडे तसेच उपाध्यक्ष म्हणून मुख्य अभियंता श्री. अनिल कोलप (महापारेषण) व अधीक्षक अभियंता श्री. अशोक घाडगे (महानिर्मिती) आणि मुख्य समन्वयक म्हणून मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके (महावितरण) व श्री. पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती) आणि विविध समितीचे प्रमुख व सदस्य कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *